सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
करंजे पूल परिसरात कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ८ आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
ही घटना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बसस्टॅन्ड परिसरात घडली. कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी संबंधित पक्ष एकत्र आले असता आरोपी व त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर जमाव जमवून काचेच्या बाटल्या, लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत ऋषिकेश सुरेश शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर करंजे पुल येथील सान्वी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १३ जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी ८ आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
ऋषिकेश शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, सखाराम अहिरे, गणेश अहिरे, महेश अहिरे तिघेही रा. नसरापूर ता. वेल्हा, स्नेहल सुरेश जगताप रा. निंबुत बारामती, सागर बाळू साळुंखे, संकेत सतीश सोनटक्के रा. मानाजी नगर पुणे, साहिल भरत सावंत, संदीप लक्ष्मण लगस रा. सिंहगड रोड पुणे.
स्नेहल सुरेश जगताप यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार. संकेत सुरेश शिंदे, ऋषिकेश सुरेश शिंदे, निकिता गणेश अहिरे, रत्ना सुरेश शिंदे, अश्विनी संकेत शिंदे सर्व रा. करंजेपूल बारामती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत असून, परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही घटना बारामती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून, कौटुंबिक वादाने हिंसक वळण घेतल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.

0 Comments